Vision & Logic
देवाची नदी (Marathi Edition)
देवाची नदी (Marathi Edition)
Couldn't load pickup availability
देवाची नदी (Marathi Edition)
सुखाचा शोध
“कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे” (स्तोत्र. ९६:५).
रेडिट ह्या सोशल मेडिया प्लॅटफोरमवर r/whatisthisthing (हे काय आहे) नावाची एक सबरेडिट (विषय) आहे. ह्या ऑनलाइन समुदायामध्ये, लोक त्यांना सापडलेल्या, पण ओळखू न शकलेल्या वस्तूंचे फोटो पोस्ट करतात. ह्यापैकी अनेक वस्तू मनोरंजक आणि गूढ असतात—जोपर्यंत कोणीतरी त्याचे स्पष्टीकरण देत नाही.
उदाहरणार्थ, एका मनुष्याने समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका कठीण, अंड्याच्या आकाराच्या वस्तूचा फोटो शेअर केला, ज्यावर 'माफर' हा शब्द कोरलेला होता. अखेरीस, कोणीतरी त्याची ओळख अंड्याचा पर्याय म्हणून पटवली. कोंबड्या कधीकधी अस्वस्थ होतात आणि स्वतःची अंडी फोडतात, परंतु जेव्हा खऱ्या अंड्यांच्या जागी ह्या पर्यायी वस्तू ठेवल्या जातात, तेव्हा कोंबडीला आपण अजूनही अंड्यांवर बसलो आहोत असे वाटते आणि ती अंडी फोडणे थांबवते. दुसऱ्या एका प्रकरणात, एका मनुष्याने जुन्या गोठ्याच्या छताजवळ असलेल्या एका लहान 'खोली'चा फोटो पोस्ट केला. त्या खोलीला कोठेही दरवाजा दिसत नव्हता आणि ते रहस्यमय वाटत होते. कोणीतरी स्पष्ट केले की ती घुबडांसाठी घरटे बनवण्याची जागा होती - ही घुबडे नुकसान न करणारी असतात आणि ती उंदीर खात असल्यामुळे ती उपयुक्त ठरतात.
ही उदाहरणे एका व्यापक सत्यावर प्रकाश टाकतात: एखादी वस्तू अचूकपणे ओळखण्यासाठी, ती कशासाठी बनवली आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. एखाद्या वस्तूचा उद्देश समजून घेतल्याशिवाय, ती खरोखर काय आहे हे परिभाषित करणे कठीण आहे. हेच तत्त्व मानवांनाही लागू होते. माणूस म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी, आपण हा प्रश्न विचारला पाहिजे: माणूस कशासाठी बनवला आहे? काहींचा असा विश्वास आहे की मानव हे अंध उत्क्रांतीवादी शक्तींचे एक अपघाती उप-उत्पादन आहेत, त्याहून अधिक काहीही नाहीत. जर हे खरे असेल, तर जीवनाला कोणताही मूळ उद्देश नाही. तरीही, केवळ कट्टर नास्तिकच त्या निष्कर्षाने खऱ्या अर्थाने समाधानी दिसतात. बहुतेक लोकांना, मग ते मान्य करोत वा न करोत, आपण येथे का आहोत हे समजून घेण्याची तीव्र इच्छा असते. काही तत्त्वज्ञ असा युक्तिवाद करतात की "जीवनाचा अर्थ" हा वाक्प्रचार मुळातच सदोष आहे, आणि "अर्थ" व "जीवन" हे शब्द एकत्र येऊ शकत नाहीत असा त्यांचा दावा आहे. पण हे एखाद्या रडणाऱ्या बाळाला, "तुला तुझ्या आईची गरज नाही—फक्त रडायचे थांबव," असे सांगण्यासारखे आहे. युक्तिवाद कितीही चलाख असला तरी, अर्थ समजून घेण्याची आपली तळमळ सहजपणे नाहीशी होत नाही. कोणीतरी शोधच अवैध आहे असे सांगितले म्हणून आपण शोधणे थांबवत नाही.
ॲरिस्टॉटलने त्याच्या 'निकोमॅचियन एथिक्स' ह्या ग्रंथात सुखाचे वर्णन मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असे केले आहे. त्याने कृती आणि ध्येये ह्यांच्यातील फरक स्पष्ट करून आपल्या विवेचनाची सुरुवात केली. आपण करत असलेल्या बहुतेक गोष्टी इतर कशासाठी तरी केल्या जातात. उदाहरणार्थ, आपण पैसे मिळवतो, ते केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही, तर त्याचा इतर कामांसाठी उपयोग करण्यासाठी. ॲरिस्टॉटल म्हणतो की, सुख हे वेगळे आहे: ती अशी गोष्ट आहे, जी आपण स्वतःसाठीच इच्छितो. ह्याच कारणामुळे, ते सर्वोच्च कल्याण आणि जीवनाचा अंतिम उद्देश म्हणून ओळखले जाते.
आनंदासाठी ॲरिस्टॉटलने वापरलेला ग्रीक शब्द 'यूडायमोनिया' आहे, जो 'यू' (चांगले) आणि 'डायमन' (दैवी शक्ती किंवा आत्मा) ह्या शब्दांपासून बनला आहे. ह्यावरून असे सूचित होते की आनंद ही दैवी कृपेने मिळालेली गोष्ट आहे—देवांकडून मिळालेली सदिच्छेची देणगी. ही कल्पना आनंदाच्या आधुनिक समजुतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आज, आनंद ही काही दिलेली गोष्ट नाही; तर ती अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण संघर्ष करतो, जी आपण मिळवतो. 'द परसूट ऑफ हॅप्पिनेस' (सुखाचा शोध) मधील ख्रिस गार्डनरप्रमाणे, आपण संघर्ष आणि चिकाटीने आनंदाचा पाठलाग करण्यास प्रवृत्त होतो, जेणेकरून एके दिवशी आपण फ्रँक सिनात्राप्रमाणे मागे वळून पाहू शकू आणि म्हणू शकू, “मी सर्व गोष्टींना सामोरे गेलो, मी खंबीरपणे उभा राहिलो आणि तेही माझ्या पद्धतीने केले.”
आधुनिक दृष्टिकोनातून, आनंद हे केवळ एक ध्येय नाही; तो आपल्या स्वातंत्र्याचा आणि निश्चयाचा एक पुरावा आहे. निष्क्रियपणे आनंद मिळवण्याची कल्पना आपल्याला जवळजवळ अपमानकारक वाटते. तथापि, पूर्वीच्या काळी, आनंद ही मिळवण्यापेक्षा बहाल केली जाणारी गोष्ट म्हणून पाहिली जात असे. 'हॅपी' हा इंग्रजी शब्दसुद्धा 'हॅप' ह्या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ 'नशीब' किंवा 'भाग्य' असा आहे. जर्मन भाषेत, 'ग्लूक' ह्या शब्दाचा अर्थ 'नशीब' आणि 'आनंद' दोन्ही होतो. ऐतिहासिकदृष्ट्या, आनंदी असणे म्हणजे भाग्यवान असणे.
परंतु, आज आपण असा विचार करत नाही. आपण सुख मिळवण्यासाठी योजना आखतो. ते मिळवण्यासाठी आपण प्रणाली आणि धोरणे तयार करतो. आपला हा ध्यास इतका तीव्र आहे की, बर्ट्रांड रसेल ह्यांनी त्याचे वर्णन 'सुखाची विजयगाथा' असे केले होते.
पैसा
आज जवळजवळ प्रत्येकजण ह्यावर सहमत आहे की आनंदासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत: पैसा आणि प्रेम. आपण ह्या दोन गोष्टींचा विचार करूया, सुरुवात पैशापासून करूया.
पैसा हे मूल्याचे एक संक्षिप्त रूप आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीला काही ना काही मूल्य असते, परंतु पैसा ते मूल्य अशा स्वरूपात प्रस्तुत करतो जे साठवले, मोजले आणि देवाणघेवाण केले जाऊ शकते. तो उपयुक्त आहे कारण तो हाताळण्यास सोपा आहे—अगदी साखरेप्रमाणे, ज्यात कॅलरीज सहज वापरता येण्याजोग्या स्वरूपात असतात. हा साधेपणा आणि कार्यक्षमता पैशाला अत्यंत आकर्षक बनवते.
ख्रिस्ती धर्मात ऐतिहासिकदृष्ट्या पैशाबद्दल दोन भिन्न दृष्टिकोन असत आले आहेत. पारंपरिक कॅथोलिक शिकवणीनुसार, गरिबी हा एक सद्गुण मानला जातो. ब्रह्मचर्य आणि नम्रतेसोबतच, याला आध्यात्मिक भक्तीचे प्रतीक मानले जाते. ह्या परंपरेत, पैशाशिवाय जगणे—ऐच्छिक असो वा अनैच्छिक—हे अनेकदा पवित्रतेचा मार्ग मानले गेले आहे. दुसरीकडे, समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर ह्यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, प्रोटेस्टंट लोक पैशाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात. मेथोडिस्ट पंथाचे संस्थापक जॉन वेस्ली ह्यांनी सारांशित केलेला दृष्टिकोन नावाजलेला आहे: "तुम्ही शक्य तितके कमवा, शक्य तितके वाचवा, आणि शक्य तितके दान करा." बहुतेक प्रोटेस्टंट लोकांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत संपत्तीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी केला जातो, तोपर्यंत ती लाजिरवाणी गोष्ट नाही.
तरीही, दोन्ही दृष्टिकोनांमध्ये त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. मी दक्षिण कोरियामध्ये लहानाचा मोठा झालो, जो माझ्या हयातीत एक गरीब देश होता आणि नंतर श्रीमंत झाला, आणि गरिबीत जगणे कसे असते हे मला आठवते. पूर्वी, दक्षिण कोरियाने असंख्य आव्हानांचा सामना केला: राजकीय दडपशाही, भ्रष्टाचार, अविकसित पायाभूत सुविधा आणि शिक्षण व आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता. अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे, ह्यापैकी अनेक समस्या सुटल्या किंवा कमी झाल्या—जरी वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांसारखे नवीन प्रश्नही समोर आले आहेत.
बहुतेक गरीब देशांना अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते: राजकीय अस्थिरता, पद्धतशीर भ्रष्टाचार, मुलांना शाळेला जाता न येणे आणि उपचार करण्यायोग्य आजारांमुळे लोकांचा मृत्यू होणे. गरिबी अनेकदा मानवी विकासात अडथळा आणते, म्हणूनच मिशनरी अनेकदा आर्थिक विकासासाठी प्रयत्न करतात. दारिद्र्य हा एक आध्यात्मिक सापळा देखील बनू शकतो, ज्यामुळे लोक तडजोड करण्यास, चोरी करण्यास, खोटे बोलण्यास किंवा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त होतात. हताश लोक अधिक धोकादायक पावले उचलण्याची शक्यता असते. काही विशिष्ट परिस्थितीत दारिद्र्य हे भक्तीचे प्रतीक असले तरी, ते लोकांना दुःखाच्या चक्रात अडकवून ठेवू शकते. असे असले तरी, आजकाल फार कमी लोक स्वेच्छेने गरिबी स्वीकारतात. बहुतेक लोकांना अधिक पैसे कमवायचे आहेत—आणि तेही लवकर. लॉटरी जिंकून, १९९० च्या दशकात नवीन तांत्रिक युद्योगांमध्ये सुरवातीलाच गुंतवणूक करून, किंवा आज क्रिप्टोकरन्सीमध्ये (इंटरनेटवर वापरली जाणारी डिजिटल चलन प्रणाली, जी बँक किंवा सरकारच्या थेट नियंत्रणाशिवाय चालते.) गुंतवणूक करून रातोरात श्रीमंत झालेल्या लोकांच्या कथांनी लोक आकर्षित होतात. संपत्ती मिळवण्याच्या ह्या तीव्र इच्छेमुळे लोक अनेकदा फसवणूक किंवा धोकादायक उद्योगांमध्ये अडकतात.
अगदी सामान्य आर्थिक व्यवहारही तणावाने भरलेले असतात. व्यवसाय मालकांना सतत दबाव, धोके आणि कठीण निर्णयांना सामोरे जावे लागते. संपत्तीच्या मागे धावण्याच्या नादात, देवाकडे दुर्लक्ष करणे सोपे असते. म्हणूनच पौलाने एक तीव्र इशारा दिला. “कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे” (१ तीमथ्य. ६:१०).
भांडवलशाही ही मानवी इच्छा-आकांक्षांवर चालणारी आर्थिक व्यवस्था आहे. लोकांनी जर अधिक मिळवण्याची इच्छा करणे थांबवले, तर अर्थव्यवस्था थांबेल. त्यामुळेच आपल्याला सतत अधिक मिळवण्याची इच्छा करण्यास प्रोत्साहित केले जाते—नवीन मोबाईल फोन, मोठी घरे, वेगवान गाड्या. जाहिराती ह्या गोष्टी दररोज आपल्या कानात इच्छा कुजबुजत असतात आणि आपल्याला अधिक मिळवण्याची गरज आहे असे पटवून देत असतात. एकदा आपण त्यावर विश्वास ठेवला की, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला अधिक पैशांची गरज आहे हे आपल्या लक्षात येते. शेवटी, पौलाने इशारा दिल्याप्रमाणे, अशा प्रकारे लोक स्वतःला “पुष्कळशा खेदांनी भोसकून” घेतात.
पैशाचे फायदे आणि मर्यादा
पैसा धोकादायक असला, तरी तो अनेक कारणांमुळे आकर्षक आहे.
पहिले, तो लहानसहान आनंद देतो. जर तुम्ही पैशाकडून विशेष आनंदाची अपेक्षा करत असाल, तर तुमची निराशा होण्याची शक्यता आहे, कारण विशेष आनंदासोबत अनेकदा दुःखेही येतात. सॉक्रेटिसने फेडो ह्या त्याच्या संवादामध्ये म्हटल्याप्रमाणे, "सुख आणि दुःख एकाच ठिकाणी जोडलेले आहेत." अन्न, दारू किंवा अंमली पदार्थ यांसारख्या गोष्टींचा अतिरेक केल्याने दुःख होते. तथापि, पैशांनी लहानसहान आनंद विकत घेता येतो: एक चांगल्या कॉफीचा कप, एक चांगला पोशाख किंवा एक नवीन मोबाईल फोन. ह्या गोष्टी कदाचित आयुष्य बदलणाऱ्या नसतील, पण तरीही त्या आनंददायक असतात.
दुसरे म्हणजे, पैसा छोट्या छोट्या समस्या सोडवतो. जेव्हा तुम्ही गरीब असता, तेव्हा अगदी लहान अडचणीसुद्धा खूप मोठ्या वाटू शकतात. व्हिटोरिओ डी सिका ह्यांच्या 'बायसिकल थीव्हज' (सायकल चोर) ह्या चित्रपटात एका माणसाची सायकल चोरीला जाते. त्याचे काम त्या सायकलवर अवलंबून असल्यामुळे, ती हरवल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब गरिबीच्या धोक्यात येते. जी गोष्ट लहान वाटते, तीच एक संकट बनते. गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या बाबतीत, कोणतीही गोष्ट पटकन संकटात बदलू शकते.
माझा एक मित्र होता जो भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीत भाग घेऊ शकला नाही, कारण त्याला साधी छोटी भेटवस्तू घेणेही परवडणारे नव्हते. जो एक आनंदाचा प्रसंग असायला हवा होता, तो चिंतेचे कारण बनला. मला माझ्या तरुणपणीचे काही प्रसंगही आठवतात, जेव्हा मी गरीब होतो. एके दिवशी, मी एका गटासोबत गंमत म्हणून, काहीही खरेदी करण्यासाठी पैसे नसताना, एका व्हॅनमधून सुपरमार्केटला गेलो. मला हे लक्षात आले नाही की प्रवासासाठी पन्नास रुपये द्यावे लागतील. लाजिरवाणे वाटल्यामुळे आणि पैसे नसल्यामुळे, मी खाली उतरलो आणि चालत घरी आलो. हा छोटासा त्रास थोड्या पैशांनी टाळता आला असता. अशा क्षणी, 'पैशाने सर्वकाही साध्य होते' (उपदेशक १०:१९) ही म्हण अगदी खरी वाटू शकते.
तिसरे कारण म्हणजे, पैशामुळे नक्कीच आनंद मिळतो – विशेषतः जर तुम्ही गरीब असाल तर. तुमच्याकडे जेव्हा खूप थोडे पैसे असतात, तेव्हा पैसा खरोखरच तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो. पण एकदा तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की, तो आनंद कमी होतो. हे सर्वश्रुत आहे की, जेव्हा उत्पन्न एका विशिष्ट पातळीवर पोहोचते (सुमारे ३० ते ५० लाख रुपये प्रति वर्ष), तेव्हा अतिरिक्त उत्पन्नामुळे आनंदात लक्षणीय वाढ होत नाही. श्रीमंत देशांमध्ये लोक फक्त श्रीमंत आहेत म्हणून आनंदी नसतात; तिथे श्रीमंती ही एक सामान्य गोष्ट असते. किंबहुना, त्यांना आपल्याकडील संपत्ती गमावण्याची चिंता सतावत असते. त्यांच्यासाठी पैसा हा आनंदाऐवजी चिंतेचे कारण बनते.
जीवनातील काही सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पैशाला देखील स्पष्ट मर्यादा आहेत. सर्वप्रथम, पैसा चांगल्या नात्यांची हमी देऊ शकत नाही. बीटल्सने म्हटल्याप्रमाणे, "पैसा माझ्यासाठी प्रेम विकत घेऊ शकत नाही." हे खरे आहे की काही स्त्रिया संपत्तीकडे आकर्षित होतात, पण नात्यांकडे पाहण्याचा हा एक अतिशय साधा दृष्टिकोन आहे. कोणी जर तुमच्या पैशांसाठी तुमच्यावर प्रेम करत असले, तर त्यांचे प्रेम टिकेल ह्याची कोणतीही हमी देता येत नाही. तुमच्या मुलांच्या बाबतीही, पैसा फारसा उपयोगी ठरत नाही. तुम्ही अशी अपेक्षा करता की तुमची मुले तुमच्या आर्थिक मदतीबद्दल आभारी राहतील, पण अनेकदा तसे घडत नाही. प्रेम विकत घेता येत नाही.
दुसरे म्हणजे, पैसा चांगल्या आरोग्याची किंवा दीर्घायुष्याची हमी देऊ शकत नाही. तो तुम्हाला उत्तम वैद्यकीय सेवा मिळवून देण्यास मदत करू शकतो, आणि आकडेवारी दर्शवते की श्रीमंत लोक जास्त जगतात. उदाहरणार्थ, कोट्याधीशांचा देश असलेल्या मोनॅकोमध्ये सरासरी आयुर्मान सर्वाधिक आहे. पण पैसा आरोग्याची हमी देऊ शकत नाही. निरोगी लोकही अपघात किंवा आजारपणामुळे तरुण वयात मरतात आणि कोणतीही संपत्ती ह्या गोष्टी रोखू शकत नाही.
तिसरे म्हणजे, कायदेशीर बाबींमध्ये पैशाचे सामर्थ्य मर्यादित असते. एक चांगला वकील मिळवण्यासाठी खूप पैसा खर्च होऊ शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुरुंगात जाण्यापासून नक्कीच वाचाल. तत्त्वतः, कायदा निष्पक्ष असला पाहिजे, जो श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान वागणूक देईल. न्यायालयात, पैसा तुम्हाला तुमच्या कृत्यांच्या कायदेशीर परिणामांपासून वाचवू शकत नाही.
पैसा उपयोगी असला आणि त्यामुळे जीवन अधिक आरामदायक होत असले तरी, तो सर्वशक्तिमान नाही. ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत, त्या पैशाने विकत घेता येत नाहीत. श्रीमंत असणे हे मुळातच काही चुकीचे नाही. पौलाने श्रीमंत लोकांना सर्व काही दान करण्यास सांगितले नाही. त्याऐवजी, त्याने त्यांना त्यांच्या संपत्तीसह चांगले जीवन कसे जगावे हे सांगितले:
“प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा” (१ तीमथ्य. ६:१७-१९).
सर्वप्रथम, श्रीमंत ख्रिस्ती लोकांनी अहंकार टाळावा. अनेक श्रीमंत लोकांना वाटते की, केवळ त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांची मते अधिक महत्त्वाची आहेत. पौल विश्वासणाऱ्यांना ह्या वृत्तीपासून सावध करतो. दुसरे म्हणजे, त्यांनी संपत्तीवर विश्वास ठेवू नये, कारण संपत्ती अस्थिर असते. युजीन पीटरसन ह्यांनी 'द मेसेज' (संदेश) ह्या त्यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, पैसा आज आहे आणि उद्या नाही. आपली आशा देवावर असली पाहिजे, जो आपल्या आनंदासाठी सर्व गोष्टी उदारपणे पुरवतो. शेवटी, श्रीमंतांनी उदार असले पाहिजे. त्यांची संपत्ती ही त्यांना मिळालेली एक देणगी आहे, जी इतरांना आशीर्वाद देण्यासाठी आहे. मी अशा अनेक ख्रिस्ती लोकांना ओळखतो जे आपल्या देणगीचा चांगल्या प्रकारे उपयोग करतात; मिशनला पाठिंबा देतात, सेवाकार्यांसाठी निधी देतात आणि गरजू लोकांना मदत करतात. ते जगातील देवाच्या कार्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात.
संपत्ती आणि दारिद्र्य, दोन्हीही आध्यात्मिक आव्हाने निर्माण करतात; म्हणून आगूरने अशी प्रार्थना केली: “व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन” (नीति. ३०:८-९).
बहुधा श्रीमंत पार्श्वभूमीतून आलेल्या पौलाला येशूची सेवा करताना अनेक कठीण परिस्थितींमधून जावे लागले, त्यात दारिद्र्याचाही समावेश होता. तो रोममध्ये कैदेत असताना, फिलिप्पैच्या मंडळींकडून उशिरा मिळालेल्या मदतीखेरीज (फिलिप्पै. ४:१५) कोणत्याही मंडळीने त्याला आर्थिक मदत केली नाही. ही एक गंभीर अडचण होती, कारण रोमी तुरुंगांमध्ये कैद्यांना पुरेसे अन्न दिले जात नसे; कैद्यांनी मित्र व कुटुंबीयांकडून येणाऱ्या मदतीवरच अवलंबून राहावे, अशी अपेक्षा असे. अनेक दशकांच्या विश्वासू सेवेनंतर, पौलाला गरीब परिस्थितीचा आणि उपासमारीच्या धोक्याला सामोरे जाण्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. तरीसुद्धा, त्याने आपल्या हालअपेष्टांवर लक्ष केंद्रित केले नाही. फिलिप्पैच्या मंडळींना लिहिलेल्या आभारपत्रात त्याने असे लिहिले:
“मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे” (फिलिप्पै. ४:११-१३).
पौलाने दारिद्र्य आणि संपत्ती, ह्या दोन्हींच्या बाबतीत सारखीच उदासीनता दाखवली, कारण देवाच्या सामर्थ्याने तो कोणत्याही परिस्थिती बाबत गर्व करत नव्हता किंवा खचून न जाता सामोरे जाऊ शकत होता. पैसा असो वा नसो, त्याचा पौलावर कोणताही प्रभाव पडत नव्हता.
प्रेम
आनंदाच्या शोधात लोक ज्या आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा पाठपुरावा करतात, ती म्हणजे प्रेम. सी. एस. लुईस ह्यांनी नमूद केले आहे की आपली आधुनिक अद्भूतरम्य प्रेमाची कल्पना प्रामुख्याने बाराव्या शतकातील फ्रान्समधील उदार प्रेमाची कल्पना ह्या परंपरेतून उदयास आली आहे. त्या काळापूर्वी, प्रेमाला अनेकदा एक धोकादायक वेड समजले जात असे, एक अशी गोष्ट जी मूळतः शहाणी असलेल्या माणसांनासुद्धा—विशेषतः स्त्रियांना, गुन्हेगारी आणि अपमानाच्या मार्गावर नेऊ शकते. हे मेडिया (अंध व विध्वंसक प्रेमाचे प्रतीक) आणि डिडो (हताश व आत्मविनाशाकडे नेणाऱ्या प्रेमाचे प्रतीक) ह्या ग्रीक व रोमन नायिकांच्या शोकांतिकांमधून स्पष्ट होते किंवा ओव्हिड ह्यांच्या लिखाणात दाखवल्याप्रमाणे, प्रेमाला कधी कधी हलके-फुलके, विनोदी स्वरूप दिलेलेही दिसते. जीवनाचा सर्वात महत्वाचा किंवा प्रभावशाली भाग म्हणून प्रेमाकडे पाहिले जात नव्हते. मात्र मध्ययुगीन युरोपमध्ये ही दृष्टी बदलू लागली. दक्षिण फ्रान्समधील ट्रुबॅडूर कवींनी एका वेगळ्याच प्रकारची प्रेमगीते गायला सुरुवात केली: आदर्श, उत्कट आणि उदात्त प्रेम. ह्या सुसभ्य प्रेमाच्या संकल्पनेने प्रेमळ आकर्षणाला सुंदर आणि अगदी आध्यात्मिक स्वरूप दिले. कालांतराने, ह्या विचारसरणीने पाश्चात्त्य संस्कृतीतील प्रेमाविषयीच्या समजुतीवर खोलवर प्रभाव टाकला.
आधुनिक काळात, जेव्हा प्रेम विशेषतः विवाहाशी जोडले गेले तेव्हा ते लोकप्रिय कल्पनाशक्तीमध्ये अधिक प्रबळ झाले आहे. मानवी इतिहासाच्या बऱ्याच काळात, विवाह हा प्रामुख्याने कुटुंबाशी संबंधित होता. जोडीदारांची निवड वैयक्तिक भावनांपेक्षा कौटुंबिक हितसंबंधांवर आधारित केली जात असे. खरे तर, पूर्व-आधुनिक कोरियामध्ये, जोडपी त्यांच्या विवाहाच्या दिवशी पहिल्यांदाच एकमेकांना पाहत असत. परंतु अठराव्या शतकात, पाश्चिमात्य देशांमध्ये व्यक्तिवादाच्या उदयामुळे, लोक वैयक्तिक भावना आणि प्रेमळ आकर्षणावर आधारित जोडीदार निवडू लागले. आज, आपण अशा जगात राहतो जिथे प्रेमाला केवळ महत्त्व तर दिलेच जाते; शिवाय ते आदर्श देखील मानले जाते. लोक म्हणतात की त्यांना "प्रेम करायला आवडते" आणि त्यांचा खरोखरच असा विश्वास आहे की त्यांना जर खरे प्रेम सापडले तर इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची राहणार नाही. या सांस्कृतिक संदर्भात, प्रेम हे सर्वोच्च आणि सर्वात महान मूल्य बनते.
प्रेमाची उत्क्रांती
देवावर विश्वास नसलेल्या लोकांसाठी, उत्क्रांतीवादी मानसशास्त्र हे आपण विशिष्ट प्रकारच्या लोकांवर प्रेम का करतो ह्याचे वेगळे स्पष्टीकरण देते. ह्या सिद्धांतानुसार, आपण जैविकदृष्ट्या असे घडवले गेलो आहोत की विरुद्ध लिंगातील काही विशिष्ट गुण आपल्याला आकर्षित करतात, कारण ते गुण आपल्या पूर्वजांना यशस्वीरीत्या संतती निर्माण करण्यास मदत करत होते. उदाहरणार्थ, असा एखादा पुरुष घ्या जो फक्त प्रसूतीक्षम वय ओलांडलेल्या स्त्रियांकडेच आकर्षित होतो. आनुवंशिक दृष्टिकोनातून पाहता, अशी आवड पुढे टिकली नसती, कारण अशा स्त्रियांना मुले होऊ शकत नव्हती. ह्याउलट, जे पुरुष तरुण, निरोगी आणि प्रजननक्षम स्त्रियांकडे आकर्षित होत होते, त्यांचे जीन पुढे जाण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे आजचे पुरुष हे यौवन आणि सौंदर्य पसंत करणाऱ्या पुरुषांचे वंशज आहेत—हे गुण प्रजननक्षमता आणि चांगल्या आरोग्याशी संबंधित आहेत. म्हणूनच पुरुष सामान्यतः तरुण आणि सुंदर स्त्रियांकडे आकर्षित होतात; हा एक स्वाभाविक संकेत आहे, जो यशस्वी उत्क्रांतीवादी धोरण प्रतिध्वनित करतो.
स्त्रियांच्या बाबतीत, जोडीदारामध्ये शोधले जाणारे गुण थोडे वेगळे असतात. अकार्यक्षम किंवा भावनाशून्य पुरुषांकडे आकर्षित झालेल्या स्त्रियांना जगणे किंवा मुलांचे संगोपन करणे कठीण गेले असण्याची शक्यता होती. त्याउलट, सक्षम, संवेदनशील आणि विश्वासार्ह जोडीदार पसंत करणाऱ्या स्त्रियांना आधार व काळजी मिळण्याची, तसेच मुलांचे यशस्वीरीत्या पालन-पोषण करण्याची शक्यता अधिक होती. म्हणून आपण जैविकदृष्ट्या जोडीदारामध्ये काही विशिष्ट गुण शोधण्यासाठी रचले गेलेलो आहोत, आणि ते गुण सापडल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती होते. हाच आनंद, म्हणजे प्रेमात पडल्याची भावना, हा उत्क्रांतीने दिलेला एक पुरस्कार आहे.
नैसर्गिक रचनेचा (दैवी योजना) भाग ह्या दृष्टीने पाहा किंवा उत्क्रांतीने घडवलेल्या प्रवृत्ती ह्या दृष्टीने पाहा, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे: आपल्याला प्रेम करायला आवडते. आपण केवळ प्रत्यक्ष आयुष्यातच प्रेम शोधत नाही, तर चित्रपट आणि दूरदर्शनवरील प्रेमकथाही मोठ्या प्रमाणावर पाहतो. लोकप्रिय चित्रपट आणि टीव्हीवरचे कार्यक्रम अनेकदा आपल्या कल्पनाविश्वाचे प्रतिबिंब असतात. उदाहरणार्थ नॉटिंग हिल हा चित्रपट पाहा. हा एका पुरुषाच्या कल्पनेवर आधारित चित्रपट आहे, ज्यात एक सर्वसाधारण माणूस योगायोगाने एका सुंदर व आकर्षक चित्रपटतारिकेला भेटतो आणि ती त्याच्यावर मनापासून, नि:शर्त प्रेम करू लागते. त्याचप्रमाणे द बिग बँग थीयरी या मालिकेत समाजात मिसळताना अडचण येणारे, पण अभ्यासात किंवा तांत्रिक गोष्टींत हुशार असलेल्या तरुणांना त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना समजून घेणारे आणि त्यांचा आदर करणारे जोडीदार मिळतात असे दाखवले आहे. हाऊ आय मेट युवर मदर ह्या चित्रपटातील मुख्य नायकाला शेवटी समजते की, जी नेहमी त्याच्या सोबत होती ती त्याची चांगली मैत्रीणच त्याने खरे प्रेम आहे. आणि फ्रेंड्स हा चित्रपट घट्ट मैत्री असलेल्या सहा जणांच्या गटाविषयी आहे ज्यापैकी चारजण शेवटी एकमेकांशी लग्न करतात. ह्या मालिका आणि चित्रपट आपल्याला आवडतात, ते वास्तव प्रतिबिंबित करतात म्हणून नव्हे, तर आपल्या जीवनात जे घडावे असे आपल्याला वाटते ते ते चित्रित करतात म्हणून आपल्याला ते आवडतात. खरे प्रेम शोधणे कठीण असले तरी, हे काल्पनिक जग आपल्याला ज्याची ओढ लागली आहे त्याची एक झलक देतात. आणि जरी आपल्याला स्वतःला तो अनुभव मिळाला नाही, तरी इतरांना, निदान पडद्यावर तरी, ते प्रेम मिळताना पाहून आपल्याला आनंद आणि समाधान मिळते.
पैसा आणि प्रेमाचे आकर्षण
ग्रीक पौराणिक कथेत, पॅरिस नावाच्या ट्रॉय देशाच्या राजकुमाराची कथा आहे, ज्याला तीन देवींपैकी सर्वात सुंदर देवी निवडण्यास सांगितले जाते. प्रत्येक देवी त्याला त्या बदल्यात काहीतरी देते: सत्ता, ज्ञान किंवा प्रेम. पॅरिस प्रेम देण्याचे अभिवचन देणाऱ्या ॲफ्रोडाइट, म्हणजेच प्रेमाच्या देवीची निवड करतो. त्याची ही निवड खूप काही सांगून जाते. ह्यातून असे सूचित होते की, जेव्हा पर्याय दिला जातो, तेव्हा लोक सत्ता किंवा ज्ञानापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व देतात.
संपूर्ण भूमध्य समुद्राच्या प्रदेशात ॲफ्रोडाईटची पूजा केली जात असे. तिला ग्रीसमध्ये ॲफ्रोडाईट, रोममध्ये व्हीनस आणि मेसोपोटेमियामध्ये इश्तार म्हणून ओळखले जात असे. कनान देशात तिला अष्टारोथ म्हटले जात असे. पवित्र शास्त्रात अशी नोंद आहे की, योशवाच्या मृत्यूनंतर, “त्यांनी परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली” (शास्ते २:१३). कनानमध्ये देवाचा प्रकाश आणण्यासाठी पाचारण केलेल्या इस्राएल लोकांनी, त्याऐवजी कनानी धर्माचा प्रभाव स्वीकारला आणि त्यांच्या दैवतांची पूजा करण्यास सुरुवात केली. बाल हा वादळाचा देव होता, जो प्रजनन क्षमता किंवा सुपीकतेशी संबंधित होता आणि चांगल्या पिकांद्वारे संपत्तीचे अभिवचन देत असे. अष्टारोथ, प्रेमाची देवी, प्रणय आणि लैंगिक समाधानाचे अभिवचन देत असे. ह्या दैवतांचे आकर्षण खूप मोठे होते: ह्या दैवतांची पूजा करा आणि तुम्हाला संपत्ती व सुख मिळेल.
आज परिस्थिती काही वेगळी आहे का? आधुनिक समाज आजही तीच आश्वासने देतो. जर तुम्ही त्याच्या मार्गांचे अनुसरण केले, जर तुम्ही 'ह्या जगाच्या देवा'ची उपासना केली, तर तुम्हाला पैसा आणि लैंगिक सुखाचे बक्षीस मिळेल. आकर्षण बदललेले नाही; फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.
सर्वजीववाद हा धर्माचा एक प्रकार आहे जो हे आश्वासन देतो. तो साधा आणि सरळ आहे: तो निसर्गातील दैवतांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मूर्तींचा वापर करतो, आणि त्या दैवतांद्वारे लोक संपत्ती, सुख आणि संरक्षण मिळवू पाहतात. पौलाने जेव्हा रोममधील लोकांना लिहिलेल्या पत्रात सुवार्तेचे पद्धतशीरपणे स्पष्टीकरण दिले, तेव्हा त्याने सर्वजीववादाच्या मूर्तीपूजेला आव्हान देऊन सुरुवात केली:
स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली (रोम. १:२२-२३).
एन.टी. राईट असा युक्तिवाद करतात की हा शास्त्रभाग मूर्तीपूजेला मूलभूत मानवी पाप म्हणून प्रकट करतो. इतिहासात प्रत्येक संस्कृतीत मूर्तीपूजा आढळते. का? कारण ती मुळात चांगल्या असलेल्या गोष्टींचे विकृत स्वरूप आहे. पौल लिहितो, “कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; (रोम. १:२०). देवाने स्वतःला निसर्गाद्वारे प्रकट केले, ह्यासाठी की, लोकांनी निर्मितीचा महिमा पाहून निर्माणकर्त्याचा शोध घ्यावा. पण देवाची उपासना करण्याऐवजी, त्यांनी निर्मितीची उपासना केली. त्यांनी “नाशवंत मनुष्य, पक्षी, प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसारख्या दिसणाऱ्या” मूर्ती बनवल्या.
ह्या जगाचा देव
सर्वजीववादाला अनेक नावे आहेत. जेव्हा त्यात अनेक देवतांचा समावेश असतो, तेव्हा आपण त्याला अनेकेश्वरवाद म्हणतो. जेव्हा पारंपरिक संस्कृतींमध्ये सामान्य लोक तो पाळतात, तेव्हा आपण त्याला लोकधर्म म्हणतो. जेव्हा यहूदी-ख्रिस्ती जगाच्या बाहेर तो पाळला जातो, तेव्हा आपण त्याला मूर्तिपूजा म्हणतो. परंतु ह्या सर्व प्रकारांमध्ये निसर्गाला चेतवणाऱ्या आत्म्यांवरील विश्वासाचा समावेश असल्याने, आपण 'सर्वजीववाद' ही संज्ञा वापरणार आहोत.
आजही अनेक सर्वजीववादी प्रथा आपल्या जीवनाचा भाग आहेत, जरी ते आपल्या नेहमीच लक्षात येत नसले तरी. आठवड्याचे दिवसांची नावे सर्वजीववादाच्या देवतांच्या नावांवरून ठेवण्यात आली आहेत: गुरुवार हे नाव बृहस्पती (देवतांचा गुरु) ह्या नावावरून ठेवले आहे, त्याचेच इटालियन भाषेतील 'जिओवेदी' म्हणजे 'ज्युपिटर' हे नाव आहे. ख्रिसमस ट्री, हा शब्द जरी आता नाताळ सणाचा एक अविभाज्य भाग असला तरी, तो वृक्षपूजेतून आला आहे. पवित्र शास्त्र ख्रिसमसचा संबंध कधीही झाडाशी जोडत नाही, परंतु त्या काळात वृक्षपूजा इतकी व्यापक होती की, तिने ख्रिस्ती परंपरेवर देखील प्रभाव टाकला.
नव्या युगाची चळवळ ही आजच्या काळातील सर्वजीववादासाठी एक आध्यात्मिक बाजारपेठ आहे. ती हिंदू धर्म आणि युरोपमधील पारंपारिक जादूपासून ते योगा, पर्यायी औषधे आणि ध्यानधारणा ह्यासारख्या सर्व गोष्टींचे मिश्रण आहे. ती आकर्षक आहे कारण ती सर्वजीववादातून प्रेरणा घेते, जो वाद मानवी मनावर आजही खूप जास्त प्रभाव टाकत आहे.
सर्वजीववाद ह्या जीवनात चांगल्या गोष्टी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याने, त्यात अनेकदा भविष्य सांगण्याच्या पद्धतींचा समावेश असतो. जर तुम्हाला भविष्य माहित असेल, तर तुम्ही संकट टाळू शकता किंवा संधी साधू शकता. ज्योतिषशास्त्र हे ह्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ते शिकवते की तारे, अंतराळातील शक्ती म्हणून, मानवाच्या भवितव्यावर प्रभाव टाकतात. शेक्सपियरने 'रोमिओ अॅण्ड ज्युलिएट' ह्या नाटकात जेव्हा त्यांना 'नशिबाने ताटातूट केलेले प्रेमी' असे म्हटले तेव्हा त्याने त्यातून ह्या विश्वासाचे प्रतिबिंब दाखवले. ही कल्पना प्राचीन आहे, पण आजही जिवंत आहे. लोक वर्तमानपत्रांमध्ये आणि ऑनलाइन राशीभविष्य वाचतात. काही लोक व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी किंवा प्रेमसंबंधातील सुसंगतपणाचा अंदाज लावण्यासाठी राशी चिन्हांचा वापर करतात. ऑगस्टिन, ज्या काळात ज्योतिषशास्त्र मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात होते, त्या काळात राहत असताना, त्याने ह्या गोष्टींना तीव्र विरोध केला. त्याने "जर जुळी मुले एकाच ताऱ्याखाली जन्माला येतात, तर त्यांचे आयुष्य अनेकदा इतके वेगळे का असते?" असा प्रश्न विचारून ह्या कल्पनेला आव्हान दिले. त्याने नैतिक जबाबदारी कमी केल्याबद्दल ज्योतिषशास्त्रावर टीका केली: त्यामुळे लोकांना असे वाटू लागले की ते जे काही करतात ते त्यांच्या निवडीने नव्हे, तर ताऱ्यांनी निश्चित केले जाते.
पूर्वजांची पूजा—विशेषतः पूर्व आशियाई संस्कृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारी ही पूजा सर्वजीववादाचे आणखी एक रूप आहे. ह्या प्रदेशात पूर्वजांना जवळजवळ देवांसारखे मानले जाते. आशीर्वाद मिळावा म्हणून लोक त्यांना अन्न अर्पण करतात. कृपा मिळवण्यासाठी अन्न अर्पण करण्याची ही पद्धत सर्वजीववादाचे एक पारंपरिक उदाहरण आहे. कन्फ्युशियनवादाने ही प्रथा अधिक तत्त्वज्ञानात्मक प्रणालीमध्ये समाविष्ट केली, पण तिची मुळे मात्र तशीच राहिली.
सर्वजीववाद आणि ख्रिस्ती धर्म ह्यातील सर्वात मोठा फरक त्यांच्या अंतिम उद्देशात आहे. सर्वजीववाद माणसांसाठी अस्तित्वात आहे, त्यातील देवता माणसांना समृद्धी, प्रेम, सुरक्षितता आणि आरोग्य मिळावे ह्यासाठी वापरली जाणारी साधने असतात. परंतु ख्रिस्ती धर्म ह्याच्या अगदी उलट आहे. तो देवासाठी अस्तित्वात आहे. त्याचा हेतू मानवी सुखसोयी नाहीत, तर देवाचे गौरव आहे. अनेक लोक येथे गोंधळतात. त्यांना वाटते की ख्रिस्ती धर्म म्हणजे आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग. त्यांना असे वाटते की, जर आपण देवाला दान दिले, (किंवा पुष्कळ वेळा चर्चला किंवा पाळकांना दिले), तर देव त्याबदल्यात आपल्याला पैसा, आरोग्य किंवा चांगली नाती देईल. पण हे शुभवर्तमान नाही. अनेक ख्रिस्ती लोक तथाकथित समृद्धीच्या शुभवर्तमानावर उपदेश करतात. जे संपत्ती आणि आरोग्याचे आश्वासन देते. परंतु येशूचे अनुसरण केल्याने अनेकदा वेदना आणि दुःख वाट्याला येतात. म्हणूनच पौल म्हणतो, “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल” (२ तीमथ्य. ३:१२)
जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. (मत्तय ५:३-१०)
हे लोक सुखी वाटत नाहीत. तरीसुद्धा, येशूच्या मते हेच लोक खरे धन्य आहेत. जगाच्या निकषांनुसार ते यशस्वी नसतील, पण ते देवाच्या राज्याचा भाग आहेत आणि तेच त्यांना खरोखर धन्य बनवते.
येथे एक मोठा विरोधाभास दिसून येतो, सुखाचा पाठलाग केला तर ते क्वचितच मिळते. ह्याच्या उलट, जे लोक देवासमोर विश्वासू जीवन जगतात, (जे इतरांची सेवा करतात, मदत करतात, आणि त्याग करतात,) त्यांनाच अनेकदा खऱ्या अर्थाने सुखी असल्याचा अनुभव येतो. आजच्या जगात सुख हाच अनेक निर्णयांचा आधार बनला आहे. एखादी गोष्ट सुख देईल असे वाटले, तर आपण ती करतो; आणि ज्यामुळे आपली गैरसोय होईल किंवा आपल्याला आराम मिळणार नाही अशा गोष्टी आपण टाळतो. म्हणूनच अनेक लोक विवाह करण्याचे किंवा मुले होऊ देण्याचे टाळतात. त्यांना स्वातंत्र्य, करिअर, पैसा आणि वेळ यांचा खर्च होईल याची भीती वाटते. पण या गोष्टींशिवाय ते अधिक सुखी होतात का? बहुतेक वेळा, नाही. अनेकांना असे लक्षात येते की स्वतंत्र, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगलेले जीवन एकाकी आणि निरर्थक वाटते.
याच्या उलट, जे लोक कुटुंबाचा कठीण मार्ग स्वीकारतात, ते अनेकदा पुष्कळ सुख अनुभवतात. पालकांना विचारा, अनेकजण सांगतील, “मुलं होणं हा आयुष्यातला सर्वात उत्तम अनुभव आहे.” निश्चितच, पालकत्व कठीण असते. रात्री उशिरापर्यंत जागरण, दवाखान्यातल्या फेऱ्या, वाद, आणि अखंड खर्च, हे सगळे त्यात येते. पण देवाच्या “फलदायी व्हा आणि बहुगुणित व्हा” ह्या आज्ञेचे पालन करत असताना (उत्पत्ति १:२८) ते आशीर्वाद अनुभवतात. इतकेच नव्हे तर, जे लोक जाणीवपूर्वक देवाचा विचार करत नाहीत, ते देखील त्याच्या रचनेत सहभागी झाल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवतात. पालकत्वाच्या कष्टांमध्ये ते धन्य ठरतात, आणि त्या धन्यतेतच त्यांना खरा आनंद सापडतो.
मी आजही ज्या ख्रिस्ती संस्थेसोबत सेवा करतो, त्यात सहभागी झालो तेव्हाची गोष्ट मला आठवते. माझे आजोबा, जे पाळक होते, पण त्याचबरोबर अतिशय व्यवहार्य माणूसही होते, मला सावध करत म्हणाले, “तू जे करायला निघाला आहेस, ते फक्त अमेरिकेतील श्रीमंत मुलांनाच परवडते.” ते चुकीचे नव्हते. आमची संस्था पगार देत नाही. तुम्ही जर श्रीमंत कुटुंबातून आलेले नसाल, तर विनामूल्य ख्रिस्ती सेवक म्हणून जगणे अत्यंत कठीण असते. त्या काळात माझे कुटुंब आर्थिक अडचणीत होते आणि मला मदत करू शकत नव्हते. अनेकदा अन्न परवडत नसल्यामुळे मला उपाशी राहावे लागत असे. आज परिस्थिती काहीशी सुधारली आहे, पण तरीही मी किमान वेतनापेक्षा कमीच कमावतो. तरीसुद्धा, मला कोणताही पश्चात्ताप नाही. देवाच्या पाचारणाला प्रतिसाद म्हणून मी त्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला, आणि मला त्याच्याकडून खूप प्रेम मिळत असल्याचे मला जाणवते. मला मरण येईल तेव्हा, देवाची सेवा केल्याचा मला कधीही पश्चात्ताप होणार नाही. उलट, त्याची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेहमीच त्याचा आभारी राहीन.
जेव्हा थॉमस जेफरसन आणि अमेरिकेचे इतर मूळ संस्थापक स्वातंत्र्यघोषणेत “जीवन, स्वातंत्र्य आणि सुखाचा शोध” हे अविभाज्य हक्क असल्याचे जाहीर करत होते, तेव्हा त्यांना वाटले की ते दुःखी लोकांना सुख शोधण्याचे स्वातंत्र्य देत आहेत. पण दोन शतकांहून अधिक काळानंतर असे दिसते की सुखाचा शोध घेताना अनेक लोक अधिकच दुःखी बनवत आहेत.
खरा आनंद मिळवता येत नाही, तो स्वीकारावा लागतो. येशू म्हणतो, “कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल” (मत्तय १६:२५). त्याचप्रमाणे, जे सुखाच्या मागे जातात, त्यांना ते कधीच मिळत नाही. पण जे सुखाच्या मागे न जाता, स्वतःसाठी नव्हे तर देवासाठी जगतात, ते अनेकदा असे अनुभवतात की सुख त्यांच्या जीवनात आले आहे, हळूच, अनपेक्षितपणे, आणि एक देणगी म्हणून.
रविवारच्या श्रद्धा आणि सोमवारच्या वास्तवातील दरी भरून काढा. देवाच्या दृष्टीकोनातून जग पाहण्यासाठी एक ताजेतवाने, संस्कृतीशी सुसंगत मार्गदर्शक.
तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवन आणि सभोवतालच्या संस्कृतीत तुटलेपणा जाणवतो का? आधुनिक चित्रपट, डिजिटल तंत्रज्ञान किंवा तुमच्या करिअरच्या गुंतागुंतींशी बायबलचा काय संबंध आहे हे समजावून सांगताना तुम्हाला अडचण येते का?
या पुस्तकात, किम सिमिओ श्रद्धा म्हणजे जगापासून दूर राहणे आवश्यक आहे या संकल्पनेला आव्हान देतात. त्याऐवजी, ते अशी प्रभावी दृष्टी मांडतात की “देवाची नदी” मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये—कला व विज्ञानापासून ते राजकारण आणि लिंगभेदापर्यंत—वाहते.
मराठी आवृत्ती · DRM-मुक्त EPUB — Apple Books, Google Play Books, Kobo किंवा कोणत्याही ई-रीडर अॅपवर वाचा.
Share

After you buy — read it your way
DRM-free files. Download once, open in the reader you already love.